


निपाणी (वार्ता) : यावर्षी निपाणी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळी परिस्थितीचा परिणाम ऊस पिकावर होण्याची शक्यता आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने ऊसाची वाढ खुंटून उत्पादनात घट होण्यासह साखर उताऱ्यावरही परिणाम होण्याचे शक्यता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
उसाची जवळपास ३० टक्के ते १०० टक्के क्षेत्रावर ऊसाची वाढ झालेली नाही. तालुक्यात ५३ हजार हेक्टर ऊस आहे. मात्र मुबलक पाणी व पाऊस नसल्याने ऊसाची वाढ थांबली असून कांडी बारीक पडली आहे. एरवी एकरी ४० ते ५० टन होणारे उत्पादन घसरून ३० ते ३५ टनांवर येण्याची शक्यता आहे. त्यातच तणाची उगवण मोठ्या प्रमाणात झाल्याने ऊसामधील रसाचे प्रमाण घटल्यामुळे तो वजनाने हलका भरत आहे.
यंदा साखर कारखान्याचा गळीत हंगाम १५ ऑक्टोंबर नंतर सुरु होण्याची शक्यता आहे. पण ऊस परिपक्व झालेल्या नसून वाळलेल्या ऊसामुळे शेतकरी व कारखानदार अडचणीत येणार आहेत. पाण्याची टंचाई लक्षात घेता शेतकरी कमी कालावधीत आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस लागवडीचे क्षेत्र कमी होऊन पीक पद्धतीत बदल होण्याची शक्यता शेतकऱ्यातून व्यक्त केले जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta