


अमान सेठ यांची तक्रार; बेळगाव उत्तरमधील प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
बेळगाव : विशेष मतदारयादी पुनरिक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेत बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील पात्र मतदारांची नावे वगळण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशयास्पद फॉर्म-७ अर्ज दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे युवा नेते अमान सेठ यांनी केला आहे. या प्रकाराची सविस्तर माहिती त्यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निदर्शनास आणून देत, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
बेळगाव उत्तर मतदारसंघात हजारो फॉर्म-७ अर्ज सामूहिक पद्धतीने दाखल करण्यात आल्याचे अमान सेठ यांनी बैठकीत सांगितले. विशेष म्हणजे मतदारांचे ईपीआयसी क्रमांक व अन्य तपशील पूर्वमुद्रित असलेले अर्ज आढळून आल्याने या प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मतदारयादी पुनरिक्षणाच्या अंतिम टप्प्यात २२, २३ आणि २४ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. अल्पसंख्याक तसेच अनुसूचित जाती-जमातींच्या मतदारांची नावे लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
या प्रकारामुळे पात्र मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्याचा सुनियोजित प्रयत्न तर होत नाही ना, असा सवाल उपस्थित झाला आहे. मतदारांचा मतदानाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी आवश्यक आहे, अशी भूमिका अमान सेठ यांनी मांडली.
दरम्यान, या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करून फॉर्म-७ अर्ज कोणाच्या माध्यमातून, कोणत्या आधारावर आणि कोणत्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आले, याचा छडा लावावा, अशी मागणीही त्यांनी केली. संबंधित यंत्रणेकडून झालेल्या संभाव्य गैरप्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सेठ यांनी सांगितले.
मतदारयादीत घोळ असल्याचा संशय निर्माण झाल्याने एसआयआर प्रक्रियेच्या पारदर्शकतेची कसोटी लागली असून, आता प्रशासन या तक्रारीवर नेमकी काय कारवाई करते, याकडे बेळगाव उत्तर मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta