


बेळगाव : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मात्र, जीवघेण्या मांजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी नागरिकांना केले आहे.
बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी मांजामुळे घडणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. गुरुवारी बेळगावमध्ये दुचाकीवरून जात असलेल्या एका युवकाच्या गळ्यात मांजा अडकून त्याचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
मांजाची खरेदी -विक्री व वापर यापूर्वीच प्रतिबंधित करण्यात आला आहे. तरीही काही जण त्याची विक्री किंवा वापर करीत असल्यास पोलिसांकडून त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. मांजा विक्री करताना कोणी आढळल्यास संबंधित विक्रेत्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा एसपींनी दिला.
पतंग उडविताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. व्यापाऱ्यांनी मांजा दोर विकू नये आणि नागरिकांनी तो खरेदी करू नये. जीवितहानी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta