


बेळगाव : शिक्षण, सहकार आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल केएलई संस्थेचे संचालक तथा माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांना २०२६ सालचा मानाचा ‘बसव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. बंगळुरू येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई होते. यावेळी श्री. दिनेश गुंडूराव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सहकार, शिक्षण आणि सार्वजनिक सेवा हे जीवनाचे ध्येय मानून महांतेश कवटगीमठ यांनी कार्य केले आहे. जनसामान्यांप्रती असलेली आस्था आणि सेवाभावामुळे त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वडील दिवंगत एम. के. कवटगीमठ यांच्या समाजाभिमुख सेवा परंपरेतून प्रेरणा घेत त्यांनी सार्वजनिक, शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील सेवाप्रवासाला सुरुवात केली.
शेतकरी संपर्क सभा, कृषी मेळावे तसेच विविध विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी समुदायाशी सातत्याने संपर्क ठेवला. कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य तसेच मुख्य सचेतक म्हणूनही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. गेल्या २६ वर्षांपासून ते केएलई संस्थेचे संचालक म्हणून शिक्षण क्षेत्रात योगदान देत आहेत.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना कवटगीमठ यांनी बसवण्णांच्या विचारांचा संदर्भ देत ज्ञान आणि प्रकाशाच्या माध्यमातून अज्ञान व अंधकार दूर करण्याचा संदेश दिला. बाराव्या शतकात बसवण्णांनी समतेवर आधारित समाजनिर्मितीचा विचार मांडला. त्यांच्या नावाने ‘बसव पुरस्कार’ मिळणे हा आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या तीन दशकांतील सार्वजनिक सेवा, केएलई शिक्षण संस्था, दूधगंगा-कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि विधान परिषद सदस्य म्हणून केलेल्या कार्याच्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा पुरस्कार केवळ व्यक्तिगत सन्मान नसल्याचे त्यांनी नमूद केले. केएलई संस्थेच्या विकासासाठी योगदान देणारे ज्येष्ठ व्यक्ती, शिक्षक, कर्मचारी, देणगीदार आणि मान्यवरांना हा सन्मान समर्पित असल्याचे सांगत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Belgaum Varta Belgaum Varta