


कित्तूर : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे ग्रामीण महिलांमध्ये रजोनिवृत्तीविषयी आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी कित्तूर येथे विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. KNVVS महाविद्यालय आणि महिला संघटनेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
श्रीमती रोहिणी बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या सत्रात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा व वक्त्या रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. रजोनिवृत्तीच्या काळात होणारे शारीरिक, भावनिक तसेच हार्मोनल बदल याबाबत त्यांनी सोप्या भाषेत माहिती दिली.
संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्रात महिलांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. रजोनिवृत्तीच्या काळात शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक स्वास्थ्याची काळजी कशी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण भागातील महिलांपर्यंत आरोग्यविषयक माहिती पोहोचविण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रोहिणी पाटील तसेच KNVVS महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता तोळगी यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटेरियन रक्षा उपाध्ये आणि रोटेरियन डॉ. स्मिता गुडगणट्टी यांनी विशेष सहकार्य केले.
रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी आणि सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांच्या पुढाकारातून हा आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आला.

Belgaum Varta Belgaum Varta