Sunday , October 4 2026
Breaking News

सार्वजनिक वाचनालयातर्फे ज्ञानसत्राचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि सार्वजनिक वाचनालय, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी अभिजात मराठी भाषा गौरव दिन आणि ज्ञानसत्र या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि झुंजार पत्रकार डॉ. विजय चोरमोरे यांची एकाच विषयावदोन व्याख्याने आयोजित केली आहेत. ‘प्रबोधन परंपरा आणि मराठी प्रदेश’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. त्यांचा अल्पपरिचय पुढील प्रमाणे-

डॉ. विजय चोरमारे यांचा अल्पपरिचय

डॉ. विजय संभाजी चोरमारे यांचे मूळ गाव चरण, ता. शिराळा, जि. सांगली हे आहे. गेली चाळीस वर्षे ते पत्रकारितेच्या व साहित्याच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. केसरी, सकाळ, लोकमत, प्रहार व महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांतून वार्ताहरापासून ते संपादकापदापर्यंत त्यांनी विविध पदांवर कार्य केले आहे. सध्या ते ‘महाराष्ट्र दिनमान’ या यू ट्यूब आणि वेब पोर्टलचे संपादक आहेत. मराठी आणि हिंदी अशा विविध वृत्तवाहिन्यावरुन आपली मते ते ठोसपणे मांडत असतात.

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेशी बांधिलकी मानून काम करणारे पत्रकार, साहित्यिक आणि कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या माध्यमातून गेली वीस वर्षे पुरोगामी साहित्य चळवळीला ते सामर्थ्य प्रदान करीत आहेत. त्यांच्या नावावर मौलिक ग्रंथ संपदा आहे. चार कविता संग्रह, पाच संपादित ग्रंथ, काही महत्वाच्या व्यक्तींच्या आत्मकथनाचे शब्दांकन, संभ्रमित काळाच्या नोंदी, गाथा भारतीय निवडणुकांची हे अभ्यासपूर्ण ग्रंथ अशी त्यांची साहित्य सेवा आहे. शोषित, वंचित अशा तळागाळातील जनतेच्या लढ्यांना संवाद पाठींबा देणारे पत्रकार म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांच्या वैचारिकतेचा आणि वक्तृत्वाचा लाभ बेळगावकरांना मिळणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून तो सार्वजनिक वाचनालयाचे सभागृह, गणपत गल्ली, बेळगाव येथे दि. ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दररोज सायंकाळी ५-३० वाजता संपन्न होणार आहे. तरी नागरिकांनी या वैचारिक ज्ञानसत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालय आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love  खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *