


बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान व श्रीराम युवक मंडळ, राजहंस गल्ली, अनगोळ यांच्या वतीने श्री गणेशोत्सव – २०२६ निमित्त कै. मारुती सुरेश हुंदरे यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याअंतर्गत राजहंस गल्ली, अनगोळ येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तसेच सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून सरकारी प्राथमिक मराठी मुलांची शाळा क्रमांक ६, ८ व ३४ येथील शालेय विद्यार्थ्यांना विविध शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव व्हावा, या उद्देशाने मंडळाच्या वतीने हे उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानचे पदाधिकारी, श्रीराम युवक मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद तसेच परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले. कै. मारुती सुरेश हुंदरे यांच्या स्मृती जपत समाजातील गरजू घटकांसाठी असे उपक्रम यापुढेही राबविण्याचा संकल्प मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Belgaum Varta Belgaum Varta