Sunday , October 4 2026
Breaking News

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका; बेळगावकर हैराण

Spread the love

 

महिनाभर पावसाची दडी; दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट, नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम

बेळगाव : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच बेळगाव शहरासह तालुक्यात उष्णतेची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवू लागला असून दुपारच्या वेळी सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे शहरातील रस्ते, बाजारपेठा, बसस्थानक परिसर आणि चौकांमधील नेहमीची वर्दळही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने वातावरणातील उष्णता वाढली आहे. सकाळी दहा वाजल्यानंतर उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढत असून दुपारी बारा ते चार या वेळेत उन्हाचा चटका असह्य होत आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत आहेत. परिणामी शहरातील प्रमुख बाजारपेठा, बसस्थानक परिसर, मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये दुपारच्या वेळी शुकशुकाट जाणवत आहे.

आरोग्यावरही परिणाम

वाढत्या उष्णतेचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना उकाड्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. डोकेदुखी, थकवा, अंगाची लाहीलाही होणे, अशक्तपणा यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी अनावश्यक घराबाहेर न पडता पुरेसे पाणी पिण्याचे आवाहन केले जात आहे.

दरम्यान, पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आणखी पावसाची गरज असतानाच ऑक्टोबर सुरू होताच पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच जाणवणाऱ्या या उष्णतेमुळे यंदा ऑक्टोबर हिटचा सामना किती तीव्रतेने करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love  खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *