


१७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी करण्याचे आव्हान
बेळगाव : रेशन कार्डधारकांच्या ई-केवायसी मोहिमेत बेळगाव जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल १७ लाख ७१ हजार ५०६ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून, जिल्ह्याने ७८.९१ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. आता उर्वरित ४ लाख ७३ हजार ३५४ लाभार्थ्यांची ई-केवायसी १० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाची धडपड सुरू आहे.
जिल्ह्यातील रेशन कार्डवरील एकूण २२ लाख ४४ हजार ८६० सदस्यांची ई-केवायसी करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये यापूर्वी ई-केवायसी केलेल्या काही सदस्यांचीही पुन्हा प्रक्रिया केली जात आहे. बोगस लाभार्थी तसेच मृत व्यक्तींची नावे रेशन कार्डमधून शोधून वगळण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये बेळगाव जिल्ह्याने सर्वाधिक ७८.९१ टक्के ई-केवायसी पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला आहे. विजापूर जिल्हा ७७.३० टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बिदर जिल्हा ४६.४८ टक्के ई-केवायसी पूर्ण करून सर्वात पिछाडीवर आहे.
दरम्यान, रेशन कार्डवरील ज्या सदस्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, त्यांच्यावर पुढील काळात कारवाई होण्याची शक्यता आहे. ई-केवायसी न करणाऱ्या सदस्यांची नावे रेशन कार्डमधून वगळली जाऊ शकतात किंवा संबंधित रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता असल्याने लाभार्थ्यांनी मुदतीपूर्वी ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१० ऑक्टोबर ही ई-केवायसीसाठी अंतिम मुदत असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता अवघ्या काही दिवसांत उर्वरित ४ लाख ७३ हजार ३५४ लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे मोठे आव्हान विभागासमोर आहे.

Belgaum Varta Belgaum Varta