Sunday , October 4 2026
Breaking News

संजीविनी ज्येष्ठ नागरिक पुरस्कार जाहीर : शिरीष गोगटे, दीपक पवार तसेच सुनीलकुमार आपटेकर यांची निवड

Spread the love

 

बेळगाव : ज्येष्ठ नागरिकांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने संजीविनी फाउंडेशनतर्फे दरवर्षी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ‘संजीविनी ज्येष्ठ नागरिक पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. यंदा उद्योग, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिरीष बी. गोगटे, सुनीलकुमार नारायण आपटेकर आणि दीपक विश्वनाथ पवार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

शिरीष बी. गोगटे हे गोगटे समूहातील दुसऱ्या पिढीतील उद्योजक असून विविध उद्योग व व्यावसायिक संस्थांशी ते संबंधित आहेत. Gogte Infrastructure Development Corporation, Belgaum Hotel Marriott, The Irish House, Spice Blends तसेच Gogte Foundation Trust यांच्याशी त्यांचा संबंध आहे. क्रिकेट व बॅडमिंटनमध्येही त्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला असून कर्नाटक विद्यापीठाचे प्रतिनिधित्व तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.

दीपक विश्वनाथ पवार यांनी उद्योग आणि क्रीडा क्षेत्रात दीर्घकाळ योगदान दिले आहे. बेळगावातील छोट्या कारागीर व कामगारांसाठी ऑटो नगर असोसिएशन उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. क्रिकेटप्रेमी म्हणून त्यांनी सलग ४० वर्षे ‘श्री गणेश ट्रॉफी सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धे’चे आयोजन केले. बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे उपाध्यक्ष म्हणून कनबर्गी येथील क्रिकेट स्टेडियमच्या उभारणीत त्यांनी योगदान दिले असून येथे रणजी तसेच भारत अ आणि महिला आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन झाले आहे. सध्या ते बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आहेत.

सुनीलकुमार आपटेकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शरीरसौष्ठवपटू असून त्यांनी तीन वेळा ‘मिस्टर इंडिया’ किताब पटकाविला आहे. तसेच ‘मिस्टर एशिया’ स्पर्धेत कांस्यपदक मिळविले असून कर्नाटकाचा प्रतिष्ठेचा एकलव्य पुरस्कार (१९९९) त्यांना प्राप्त झाला आहे. त्यांनी भारताचे तीन वेळा वरिष्ठ आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रतिनिधित्व केले असून चीनमधील चोंगकिंग तसेच दक्षिण कोरियातील सोल आणि बुसान येथे सहभाग घेतला. ‘मिस्टर रेल्वे’ सात वेळा आणि ‘मिस्टर साउथ इंडिया’ चार वेळा अशीही त्यांची कामगिरी आहे. १८ वर्षांच्या क्रीडा कारकिर्दीत त्यांनी अनेक शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून तरुणांना फिटनेस व क्रीडा क्षेत्राकडे प्रेरित केले आहे.

समाजातील ज्येष्ठांच्या दीर्घकाळाच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या अनुभवातून नव्या पिढीला प्रेरणा मिळवून देणे, हा पुरस्काराचा उद्देश आहे. संजीविनी फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य, सामाजिक सहभाग आणि सन्मानपूर्वक जीवनासाठी विविध उपक्रमही राबविले जातात.

पुरस्कार वितरण समारंभ रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता जी. जी. चिटणीस स्कूल, टिळकवाडी, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका; बेळगावकर हैराण

Spread the love  महिनाभर पावसाची दडी; दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट, नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम बेळगाव : ऑक्टोबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *