Monday , October 5 2026
Breaking News

‘सुर्वेंचा संघर्ष आजही लढणाऱ्या माणसाला बळ देणारा’

Spread the love

 

बेळगाव : रस्त्याच्या कडेला सापडलेल्या मुलाला घरात अठरा विश्वे दारिद्र्य असतानाही गंगाराम सुर्वे यांनी घरी आणले, आपला मुलगा मानले आणि त्याला आपले नाव दिले. पुढे याच मुलाने आपल्या कर्तृत्वाने जगभर नाव कमावले. वयाच्या तिशीनंतर नारायण सुर्वे यांच्या संघर्षमय जीवनाला काव्यातून वाचा फुटली. वाचन, भाषण आणि लेखन ही त्यांच्या जगण्याची त्रिसूत्री बनली. ‘जे लढतात, त्यांना साथ द्यायला हवी’, या अंतःप्रेरणेने त्यांनी आयुष्यभर लेखन केले. त्यांच्या कवितेतून अल्पाक्षरांत प्रचंड मोठा आशय आणि गहन अर्थ व्यक्त होतो, असे प्रतिपादन पुण्याच्या लेखिका व समीक्षक डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी केले.

मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या अंतर्गत वरेरकर नाट्यसंघ, बेळगाव येथे नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘ऐसा गा मी ब्रह्म – अर्थात नारायण सुर्वे यांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बोकील-कुलकर्णी बोलत होत्या. व्यासपीठावर मंथनच्या अध्यक्षा प्रिया कवठेकर आणि उपाध्यक्षा अस्मिता आळतेकर उपस्थित होत्या.

नारायण सुर्वे यांचा फुटपाथ ते झोपडी, चाळ, फ्लॅट आणि स्वतःचे घर असा संघर्षमय जीवनप्रवास अचंबित करणारा आहे. या प्रवासात त्यांच्या पत्नी कृष्णाबाईंनीही त्यांना खंबीर साथ दिली. पत्नीच्या आग्रहामुळे मुलाच्या शाळेत शिपाई म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्या सातवीत शिकणाऱ्या मुलासोबत सातवीची परीक्षा दिली. पुढे शिक्षण पूर्ण करून त्याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. पती-पत्नीने एकमेकांना साथ देत सुख-दुःखांना सामोरे जात संसार केला, असे डॉ. बोकील-कुलकर्णी यांनी सांगितले.

सुर्वेंची कविता त्यांच्या प्रत्यक्ष जगण्याशी जोडलेली होती. शिक्षण मर्यादित असतानाही अनुभव, निरीक्षणशक्ती आणि काव्यप्रतिभेच्या बळावर त्यांनी समाजाचे शिक्षक म्हणून भूमिका बजावली. सामान्य माणसाचे कष्ट, प्रेम, संघर्ष, आशा आणि वास्तव त्यांच्या कवितेत प्रभावीपणे उमटले आहे. त्यामुळे त्यांच्या कविता आजही वाचकांच्या मनाला भिडतात आणि जगण्याची प्रेरणा देतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मंथनच्या अध्यक्षा प्रिया कवठेकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्रुती परांजपे यांनी केले, तर अस्मिता आळतेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला रसिकांची मोठी उपस्थिती होती.

About Belgaum Varta

Check Also

दसरा सुट्टी रद्द करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाईची श्रीराम सेनेची मागणी

Spread the love  बेळगाव : शासनाने जाहीर केलेल्या दसरा सुट्टीच्या कालावधीत शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *