Monday , October 5 2026
Breaking News

गांधी समजून घेणे आव्हानात्मक

Spread the love

 

प्रगतिशील लेखक संघातर्फे गांधी जयंती साजरी

बेळगाव : महात्मा गांधी हे शेतकरी आणि कामगारांचे नेते होते. त्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सातत्याने लावून धरले. त्यामुळेच सामान्य माणूस त्यांच्या मागे उभा राहिला, असे प्रतिपादन प्रा. आनंद मेणसे यांनी केले.

राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने प्रगतिशील लेखक संघ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ‘गांधीजी समजून घेताना’ या विषयावर प्रा. मेणसे बोलत होते. गांधीवादी कार्यकर्ते डॉ. शिवाजी कागणीकर अध्यक्षस्थानी होते.

मराठी विद्यानिकेतनच्या शिक्षण संयोजिका निला आपटे यांनी ‘वैष्णव जन तो तेने कहिये’ हे भजन सादर केले. त्यानंतर डॉ. शिवाजी कागणीकर यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रगतिशील लेखक संघाचे कार्यवाह कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बेळगावचे कार्यवाह जे. बी. अगसीमनी यांच्या हस्ते डॉ. कागणीकर आणि प्रा. मेणसे यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.

प्रा. मेणसे म्हणाले, महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले. ज्या व्यक्ती अथवा संस्थेविरोधात सत्याग्रह करायचा आहे, त्याचा द्वेष करायचा नाही, हे तत्त्व त्यांनी पाळले. हाती घेतलेले आंदोलन यशस्वी होईपर्यंत ते सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार होता. मनुस्मृतीचा थेट उल्लेख न करता तिच्यातील अनेक नियम गांधीजींनी आपल्या आंदोलनातून नाकारले होते, असेही त्यांनी सांगितले.

कम्युनिस्ट नेत्यांविषयी गांधीजींना सहानुभूती होती. मिरत कट खटल्यात अटक करण्यात आलेल्या कम्युनिस्ट नेत्यांचे खटले गांधीजींच्या सूचनेनुसार मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू यांनी चालविले होते. त्यामुळे कम्युनिस्ट नेत्यांमध्येही गांधीजींविषयी आदराची भावना होती, असे प्रा. मेणसे यांनी नमूद केले.

गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगावात १९२४ मध्ये झालेले काँग्रेस अधिवेशन, बिहारमधील निळीचे आंदोलन आणि १९४२ चे ‘चले जाव’ आंदोलन यांचा त्यांनी आढावा घेतला. स्वातंत्र्याचा लाभ बहुजन समाजाला मिळाला पाहिजे, ही गांधीजींची भूमिका होती. ही भूमिका मान्य नसलेल्या प्रवृत्तीनेच त्यांची हत्या केली, असे सांगून गेल्या काही वर्षांत नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

डॉ. शिवाजी कागणीकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन शिवाजी हसनेकर यांनी केले, तर सागर मरगाणाचे यांनी आभार मानले. गिरीश कॉम्प्लेक्समधील भगतसिंग सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

दसरा सुट्टी रद्द करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाईची श्रीराम सेनेची मागणी

Spread the love  बेळगाव : शासनाने जाहीर केलेल्या दसरा सुट्टीच्या कालावधीत शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *