


शिवठाणच्या पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
खानापूर : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये खानापूर तालुक्यातील सरकारी के.बी.एस. माध्यमिक शाळा, मुगळीहाळ येथील मैदानावर झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था, येळूर संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाणच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात शिवठाणच्या खेळाडूंनी सांघिक खेळ, भक्कम बचाव, आक्रमक चढाया आणि संयमी खेळाचे दर्शन घडविले. पहिल्या फेरीत बेळगाव तालुका-शहर संघावर मात करून संघाने विजयी सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत रामदुर्ग तालुका संघाचा पराभव केला. तिसऱ्या फेरीत बैलहोंगल तालुका संघाविरुद्ध कडवी झुंज देत शिवठाणच्या संघाने अंतिम फेरी गाठली.
संघाचा कर्णधार लक्ष्मण कोलकार याने संपूर्ण स्पर्धेत प्रभावी खेळाचे प्रदर्शन केले. निर्णायक क्षणी केलेल्या आक्रमक चढाया तसेच सहकाऱ्यांना योग्य दिशा देत केलेल्या नेतृत्वामुळे त्याने संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या कामगिरीचे क्रीडाप्रेमी तसेच प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनीही कौतुक केले.
अंतिम सामन्यातही शिवठाणच्या खेळाडूंनी शेवटपर्यंत जोरदार लढत देत जिल्ह्यात उपविजेतेपद मिळविले. या यशामुळे श्री रवळनाथ हायस्कूल आणि श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल झाले आहे.
या संघाला प्रशिक्षक पी. टी. चोपडे, तर संघ व्यवस्थापक एन. व्ही. नाईक व व्ही. बी. पाटील यांनी मार्गदर्शन व व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. मुख्याध्यापक पी. ए. पाटील तसेच शिक्षकवर्गाचेही संघाला सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले.
या यशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिवठाणच्या संघातील पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये कर्णधार लक्ष्मण कोलकार याच्यासह आणखी चार खेळाडूंचा समावेश आहे. राज्यस्तरीय स्पर्धा आगामी १४ तारखेच्या सुमारास होण्याची शक्यता असून, निवड झालेल्या खेळाडूंची पुढील स्पर्धेसाठी तयारी सुरू आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेचे चेअरमन वाय. एन. मजुकर व सेक्रेटरी प्रसाद मजुकर यांनी खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्गाचे अभिनंदन केले.
शिवठाण हायस्कूलच्या या यशामुळे खानापूर तालुक्यासह शिवठाण पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, सराव आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते जिल्हा तसेच राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, याचे हे यश प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta