


बेळगाव : अवैधरीत्या मटका जुगार चालविणाऱ्या अड्ड्यावर काकती पोलिसांनी छापा टाकून एका संशयिताला ताब्यात घेतले. या कारवाईत २ हजार २०० रुपये रोख रक्कम आणि मटका जुगाराच्या ओसी चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या.
३ ऑक्टोबर रोजी काकती पोलीस ठाण्याचे पीएसआय मृत्युंजय मठद यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मन्नूर गावातील डायट महाविद्यालयाजवळील सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
यावेळी मन्नूर येथील जनता कॉलनीचा रहिवासी बजरंग अशोक कदम (४०) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आकड्यांवर नागरिकांकडून पैसे स्वीकारून मटका जुगार चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत जुगारातून जमा होणारी रक्कम बेळगाव येथील ईश्वर नाईक याला देत असल्याचे बजरंगने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२४/२०२६ नुसार कर्नाटक पोलीस कायदा कलम ७८(३) अंतर्गत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta