Monday , October 5 2026
Breaking News

युवा समिती सीमाभागचे एकंबावासीयांकडून उत्स्फूर्त स्वागत व सन्मान

Spread the love

 

सीमालढ्यासाठी एकत्रितपणे ठोस पावले उचलण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

एकंबा : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार कै. बापूसाहेब एकंबेकर पाटील यांच्या एकंबा या गावाला धावती भेट दिली. कोणतीही पूर्वकल्पना न देता दिलेल्या या भेटीदरम्यान गावातील प्रमुख कार्यकर्ते संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सतीश वासरे, राम रावणगावे, नारायण पाटील तसेच भागातील ज्येष्ठ समिती कार्यकर्त्यांनी युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत व सन्मान केला.

यावेळी शिवस्मारकाला अभिवादन करण्यात आले. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट होत असल्याची माहिती मिळताच अनेक मराठीप्रेमी नागरिक आवर्जून उपस्थित राहिले. अनपेक्षित भेट असूनही ग्रामस्थांनी दाखवलेला उत्साह आणि आपुलकी पाहून सीमालढ्याशी असलेली त्यांची नाळ आजही तितकीच घट्ट असल्याचे जाणवले.

एकंबा, औराद आणि कमलनगर हा परिसर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी माणसाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आजही या परिसरातील नागरिकांमध्ये सीमालढ्याबद्दल तोच जोश, तोच उत्साह आणि तीच तळमळ कायम असल्याचे या भेटीत दिसून आले.

यावेळी ग्रामस्थांनी आगामी काळात सीमालढ्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलली जावीत, त्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास व्यक्त केला. सीमाभागातील मराठी जनतेचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

यावर शुभम शेळके यांनीही ग्रामस्थांचे आभार मानत, “सीमालढा हा केवळ काही व्यक्तींचा नव्हे, तर असंख्य मराठी बांधवांच्या अस्मितेचा आणि हक्काचा लढा आहे. एकंब्यासारख्या बालेकिल्ल्यातील मराठी जनतेचा मिळणारा हा विश्वास आमच्यासाठी मोठी ताकद आहे. येत्या काळात आपण सर्वजण एकत्रितपणे हा लढा अधिक ताकदीने लढू आणि निश्चितच जिंकू,” असा विश्वास व्यक्त केला.

एकंबा भेटीदरम्यान झालेल्या या उत्स्फूर्त स्वागतामुळे सीमालढ्याच्या पुढील वाटचालीसाठी युवा समिती आणि स्थानिक समिती कार्यकर्त्यांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

मटका जुगार अड्ड्यावर काकती पोलिसांचा छापा; एक ताब्यात

Spread the love  बेळगाव : अवैधरीत्या मटका जुगार चालविणाऱ्या अड्ड्यावर काकती पोलिसांनी छापा टाकून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *