Tuesday , October 6 2026
Breaking News

अपघात प्रकरणात टेम्पो चालक व मालकाची निर्दोष मुक्तता

Spread the love

 

बेळगाव : झाड शहापूरजवळील दर्ग्याजवळ २०१९ मध्ये झालेल्या प्राणघातक अपघाताच्या प्रकरणात टेम्पो चालक आणि मालकाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. साक्षीदारांच्या जबाबांमध्ये व साक्षींमध्ये आढळलेल्या विसंगतींच्या आधारे दुसरे जेएमएफसी न्यायालयाने हा निर्णय दिला.

३० डिसेंबर २०१९ रोजी दुपारी सुमारे २ वाजता सचिन ज्योतिबा नाईक (३१) हे मोटरसायकलवरून देसूरहून बेळगावच्या दिशेने जात होते. झाड शहापूरजवळील दर्ग्याजवळ पोहोचले असता खानापूरच्या दिशेने जाणाऱ्या ४०७ टेम्पोने कथितरीत्या नियंत्रण गमावून चुकीच्या बाजूला जात त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात सचिन नाईक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याच दिवशी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर टेम्पो चालकाने पोलिसांना माहिती न देता वाहन घटनास्थळी सोडून पळ काढल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी मृताचे भाऊ संदीप ज्योतिबा नाईक यांनी बेळगाव ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार भादंवि कलम २७९, ३०४(अ) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १३४ व १८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासात टेम्पो चालक परशराम उमाजी पाखरे (३०, रा. ईदलहोंड, ता. खानापूर) याचा वाहन चालविण्याचा परवाना मुदतबाह्य असल्याचे, तसेच टेम्पोचा विमाही संपलेला असल्याचे समोर आले. त्यामुळे वाहनमालक रामा पुंडलिक गुरव (४०, रा. सिंगीनकोप, पोस्ट ईदलहोंड) याच्याविरुद्धही मोटार वाहन कायद्यानुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले.

मात्र, सुनावणीदरम्यान अभियोजन पक्षाच्या साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आल्याने आरोप ठोसपणे सिद्ध झाले नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे दुसरे जेएमएफसी न्यायालयाने चालक परशराम पाखरे आणि वाहनमालक रामा गुरव यांची निर्दोष मुक्तता केली.

आरोपींच्यावतीने अॅड. मारुती कामानाचे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

दसरा महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मध्यवर्ती दसरा महामंडळाचे महापालिकेला निवेदन

Spread the love  बेळगाव : बेळगावचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला दसरा महोत्सव यंदाही उत्साहात, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *