


खानापूर : चापगाव व परिसरातील विविध गावांना जोडणाऱ्या खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व नव्याने डांबरीकरण करावे, तसेच वड्डेबैल-चापगाव-यडोगा-लोकोळी-लक्केबैल परिसरातील नादुरुस्त बंधाऱ्याची दुरुस्ती व आवश्यक असल्यास पुनर्बांधणी करावी, अशा मागण्यांचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांना देण्यात आले.
खानापूर येथील लोकमान्य भवनात आयोजित ‘प्रजासेवा आंदोलन’ उपक्रमात हे निवेदन सादर करण्यात आले. तालुका व जिल्हास्तरावरील विविध प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना एकत्रित आणून नागरिकांच्या सार्वजनिक समस्या जाणून घेऊन त्यावर प्रशासकीय पातळीवर तोडगा काढण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेळगांव जिल्ह्याचे पालक मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. सतीश जारकिहोळी साहेब, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश धबाले यांनी चापगाव व परिसरातील नागरिकांच्या रस्ते तसेच बंधाऱ्याशी संबंधित समस्यांकडे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांचे लक्ष वेधले.
चापगाव ग्रामपंचायत तसेच परिसरातील गावांना जोडणारे चापगाव–कारलगा–लालवाडी, चापगाव–चिकदिनकोप, चापगाव–जळगे–करंबळ, चापगाव–यडोगा–खानापूर आणि चापगाव–बेकवाड हे प्रमुख रस्ते अत्यंत खराब झाले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. डांबरीकरण उखडल्यामुळे हे मार्ग धोकादायक बनले असून विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः गर्भवती महिला, लहान मुले आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठीही अडचणी निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच कारलगा येथे श्री लक्ष्मीदेवीची जत्रा होणार असल्याने चापगाव–कारलगा –लालवाडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
दुसऱ्या निवेदनात वड्डेबैल, चापगाव, यडोगा, लोकोळी व लक्केबैल परिसरातील बंधाऱ्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यात आले. बंधाऱ्याच्या खालच्या भागातून पाण्याची गळती होत असल्याने अपेक्षित पाणीसाठा निर्माण होत नाही. परिणामी शेकडो हेक्टर शेती तसेच परिसरातील शेतकरी, नागरिक आणि पशुधनावर त्याचा परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बंधाऱ्याची तातडीने तांत्रिक पाहणी करून पाण्याची गळती थांबवावी, आवश्यक दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करावी आणि बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा निर्माण होईल अशी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. बांधकाम निकृष्ट असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थांनी दोन्ही प्रश्नांवर तातडीने प्रशासकीय कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली. रस्ते व बंधारा दुरुस्तीची कामे एका महिन्याच्या आत सुरू न झाल्यास लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. बंधाऱ्याच्या प्रश्नावरही शेतकरी व ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला.
निवेदन देण्यासाठी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश धबाले, जयदेव अंबाजी, मुकुंद पाटील, नारायण गोदी, बाजीराव पाटील, भास्कर पाटील, उदय पाटील, रामा कुकडोळकर, प्रभू कदम, मष्णू चोपडे, विलास धबाले सर, फोंडू धबाले, विठ्ठल पाटील, अर्जुन सुतार, पुंडलिक जीवई, अरविंद पाटील, अशोक बेळगावकर, महाबळेश्वर घारशी, सतीश पाटील, बाळू पाटील, हनुमंत बेळगावकर, पांडुरंग पाटील, सूर्याजी पाटील, कल्लाप्पा पाटील, अरविंद पाटील, अनिल बेळगांवकर, परशराम येळगुळकर, मष्णू बिरजे, चेतन मादर, मल्लाप्पा मादर आदी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या या मागण्यांवर संबंधित विभागांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून आवश्यक प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक अहवाल व निधीची तरतूद करून कामांना गती द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

Belgaum Varta Belgaum Varta