


सोन्याची अंगठी, ४० ग्रॅम चांदीची साखळीही चोरट्यांनी पळविली; उज्वलनगरमध्ये खळबळ
बेळगाव : उज्वलनगर दुसरा क्रॉस येथे बंद घराचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. चोरट्यांनी घरातील तिजोरी फोडून दोन लाख रुपयांची रोकड, सोन्याची अंगठी आणि सुमारे ४० ग्रॅम वजनाची चांदीची साखळी असा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उज्वलनगर दुसरा क्रॉस येथील झेबा मुल्ला या कुटुंबीयांसह २ ऑक्टोबर रोजी गोवा येथे गेल्या होत्या. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. रविवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्या असता मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. घरात प्रवेश केल्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.
तिजोरीची पाहणी केली असता त्यातील दोन लाख रुपयांची रोकड, सोन्याची अंगठी आणि सुमारे ४० ग्रॅम वजनाची चांदीची साखळी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी श्वानपथक तसेच तज्ज्ञांची मदत घेत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत चोरट्यांचा ठोस माग लागला नव्हता.
कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची माहिती मिळवून बंद घरांना लक्ष्य केले जात असल्याची शक्यता या घटनेमुळे व्यक्त होत आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी घर बंद ठेवून बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी शेजाऱ्यांना तसेच स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta