


बेळगाव : हिवाळ्याच्या तोंडावरच बेळगावकरांच्या तोंडचे पाणी पळाले असून, शहरातील अनेक भागांत पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू झाली आहे. तब्बल आठ ते दहा दिवसांच्या अंतराने होणारा पाणीपुरवठाही अपुरा पडत असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून महापालिका आणि एल अँड टी कंपनीकडून शहरात तब्बल ४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. हिवाळ्यातच ही अवस्था असल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहराला राकसकोप आणि हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या मार्कंडेय नदीतूनही पाणी उपसा सुरू आहे. दोन्ही जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी जलशुद्धीकरण केंद्रांना सुरळीत वीजपुरवठा न मिळाल्याने पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.
मात्र, कारणे कोणतीही असोत, त्याचा थेट फटका सर्वसामान्य बेळगावकरांना बसत आहे. आठ-दहा दिवसांनी नळाला येणारे पाणीही पुरेसे मिळत नसल्याने विशेषतः महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. घरगुती गरजा भागविण्यासाठी नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन विविध प्रभागांतील नगरसेवकांनी महापालिका आणि एल अँड टी कंपनीकडे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. त्यानुसार सध्या शहरात ४१ टँकर धावत असून, बेळगाव उत्तर मतदारसंघात २५ तर बेळगाव दक्षिण मतदारसंघात १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
हिवाळा सुरू होण्यापूर्वीच शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा कोलमडत असेल, तर उन्हाळ्यात परिस्थिती किती गंभीर होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात धावपळ करण्याऐवजी महापालिकेने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे ठोस आणि दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. टँकरवर अवलंबून राहण्यापेक्षा शहराचा नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Belgaum Varta Belgaum Varta