


अष्टमी-नवमी एकाच दिवशी; वैशिष्ट्यपूर्ण दसरोत्सवाची पर्वणी
निपाणी (वार्ता) : आदी शक्तीची उपासना, साधना आणि जागराचा उत्सव असलेल्या शारदीय यंदा नवरात्रोत्सवाला पंचांगातील वैशिष्ट्यपूर्ण तिथी संयोगामुळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. रविवारी (ता.११) घटस्थापनेने नवरात्राला प्रारंभ होणार असून १९ ऑक्टोबरला अष्टमी आणि नवमीचे पूजन एकाच दिवशी होणार आहे. त्यानंतर २० ऑक्टोबरला विजयादशमी साजरी होईल. त्यामुळे यंदाच्या नवरात्रात तिथींच्या क्रमात बदल जाणवणार आहे.
नवरात्राची प्रतिपदा तिथी १० ऑक्टोबरच्या रात्री ९.१९ वाजता सुरू होऊन ११ ऑक्टोबरच्या रात्री ९.३० वाजता संपणार आहे. त्यामुळे
घटस्थापना ११ ऑक्टोबरला केली जाणार आहे. घटस्थापनेसाठी सकाळचा मुहूर्त ६.३१ ते १०. २७ असा दिला आहे. यंदाच्या नवरात्रात सप्तमी तिथी दोन दिवस व्यापणार असून १७ व १८ ऑक्टोबरला सप्तमीचे आचरण आहे. १९ ऑक्टोबरला अष्टमी आणि नवमी एकत्र येणार आहेत. या दिवशी दुर्गाष्टमीची पूजा, संधीपूजा, महागौरी-सिद्धिदात्री आराधना, हवन, कन्यापूजन आदी धार्मिक विधी होणार आहेत. पंचांगपरंपरेनुसार यंदा देवीचे आगमन हत्तीवरून होणार असून हत्तीला समृद्धी, स्थैर्य आणि भरभराटीचे प्रतीक मानले जाते.
नवरात्रात घटस्थापनेपासून अखंड दीप, दुर्गासप्तशती किंवा देवीभागवताचे पठण, देवीस्तोत्र, नामस्मरण, उपवास, जप, होमहवन आणि जागरण अशा साधना केल्या जातात. शक्तीच्या विविध रूपांची उपासना करताना प्रतिपदेचा संकल्प, सप्तमीची विशेष आराधना, अष्टमीची दुर्गापूजा आणि नवमीचे हवन-कन्या पूजन अशा कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta