


तनुज सिंगची दोन सुवर्णपदकांसह सात पदकांवर मोहोर; आबा हिंद स्पोर्ट्स क्लबची १३ पदकांची कमाई
बेळगाव : म्हैसूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय दसरा सीएम कप जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी शानदार कामगिरी करत एकूण १३ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत तनुज सिंग याने दोन सुवर्णपदकांसह एकूण सात पदके पटकावत विशेष चमक दाखवली.
तनुज सिंग याने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि १०० मीटर बटरफ्लाय या प्रकारांत सुवर्णपदके मिळवली. तसेच ५० मीटर बटरफ्लाय आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्यपदके पटकावली. याशिवाय रिलेमध्ये एक रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळवत त्याने एकूण सात पदकांची कमाई केली.
कुमार चिन्मय बागेवाडी याने ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात रौप्यपदक मिळवले. तसेच रिले प्रकारातही रौप्यपदक पटकावले. कुमार आदी शिरसाठ याने रिले प्रकारात रौप्यपदक मिळवले.
कुमारी वेदा खानोलकर हिने ५० मीटर आणि १०० मीटर बटरफ्लाय या प्रकारांत तसेच रिले स्पर्धेत कांस्यपदके मिळवत एकूण तीन पदकांची कमाई केली.
या सर्व जलतरणपटूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर बेळगावच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांच्या यशामागे एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव आणि रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच हिंद सोशलच्या सेक्रेटरी सावित्री दोड्डणावर, अरविंद संगोळी, शितल हुलबत्ते, राजू मुंदडा आणि शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन मिळाले.
या यशाबद्दल सर्व जलतरणपटूंचे क्रीडाप्रेमींकडून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta