


१० कचरा वेचकांचाही सन्मान; स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव
बेळगाव : शहर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या ३० सफाई कर्मचाऱ्यांचा त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच, परिसर स्वच्छ ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या १० कचरा वेचकांचाही सत्कार करण्यात आला.
समाजातील अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या घटकांच्या श्रमांचे महत्त्व अधोरेखित करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. नागरिकांनी टाकलेला कचरा गोळा करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हे कर्मचारी आणि कचरा वेचक सातत्याने मेहनत घेत असतात. त्यांच्या योगदानामुळे शहराचे आरोग्य आणि स्वच्छता राखण्यास मोठी मदत होते.
यावेळी रोटरी क्लबच्या लोगो असलेल्या पिशव्यांचेही वाटप करण्यात आले. या माध्यमातून रोटरीची सेवाभावना आणि समाजकल्याणाप्रती असलेली बांधिलकी जनतेपर्यंत पोहोचविण्यात आली. प्रत्येक व्यवसाय आणि कामाचा सन्मान केला पाहिजे, तसेच समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना योग्य प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमाला रोटेरियन रक्षा उपाध्ये, रोटेरियन शीला पाटील, रोटेरियन सविता हेब्बार आणि डॉ. स्मिता गुडगणट्टी यांची उपस्थिती होती. रोटेरियन सुजाता वस्त्रद यांनी उपक्रमाचे संयोजन केले. रोटरी क्लबच्या अध्यक्ष रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी आणि सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

Belgaum Varta Belgaum Varta