


बेळगाव : “या जगातून दुसऱ्या जगात जाताना शरीर सोबत नेता येत नाही. शरीरावर नियंत्रण ठेवणारा आत्माच पुढील प्रवास करतो. त्यामुळे शरीर हे आत्म्याचे वाहन आहे,” असे विचार संजीव जाधव उर्फ सुदर्शन प्रभू यांनी व्यक्त केले.
हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात शनिवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ‘अध्यात्माची शक्ती’ या विषयावर ते बोलत होते.
यावेळी जाधव म्हणाले की, सर्व जीवांमध्ये मनुष्य हा बुद्धिमान आणि जबाबदार प्राणी आहे. जीवनात येणाऱ्या अनेक अडचणींचे मूळ अज्ञानात आहे. शरीर हे दुःखाचे कारण ठरू शकते, तसेच आनंदाचेही माध्यम आहे. भगवंताच्या सान्निध्यात राहिल्याने मनुष्याला आनंदाची अनुभूती मिळते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. हनुमंताला सामर्थ्य आणि शक्तीचे वरदान लाभले असल्याने त्याला ‘महाबली’ असेही संबोधले जाते, असे त्यांनी सांगितले.
प्रभू रामचंद्र पंचवटी, नाशिक येथून श्रीलंकेकडे जाताना बेळगावात आले होते. त्यांच्या पदस्पर्शाने कणबर्गीजवळील परिसर पावन झाला असून, हे ठिकाण रामतीर्थ म्हणून ओळखले जाते. येथून पुढे जाताना प्रभू रामचंद्रांना वाटेत शबरी भेटली, अशी माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे चिटणीस अनंत लाड यांच्या प्रास्ताविक व स्वागताने झाली. उपाध्यक्ष प्रकाश माहेश्वरी यांनी संजीव जाधव यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. खजिनदार रघुनाथ बांडगी यांनी आभार मानले.
यावेळी योगगुरू एस. बी. कुलकर्णी, देवकुमार बिरजे, एम. बी. घोरपडे, शंकरराव चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta