


फुलबाग गल्लीतील रेल्वे ट्रॅकजवळ आढळला मुद्देमाल; तमिळनाडू आणि तेलंगणातील चोरीशी संबंध
बेळगाव : बेळगावच्या मार्केट पोलिसांनी आंतरराज्यीय चोरीप्रकरणी मोठी कारवाई करत सुमारे ३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. फुलबाग गल्ली येथील रेल्वे ट्रॅकजवळ सोडून दिलेल्या बनावट नंबरप्लेटच्या स्कॉर्पिओ गाडीसह तांब्याचे २२ कॉपर रोल्स आणि ॲल्युमिनियमच्या तारांचे पाच बंडल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. प्राथमिक तपासात या चोरीचे धागेदोरे तमिळनाडू आणि तेलंगणा राज्यांशी जोडले गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
२४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फुलबाग गल्ली येथील रेल्वे ट्रॅकजवळ संशयास्पद वाहन सोडून दिल्याची माहिती मार्केट पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता, चांदीच्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आणि मोठ्या प्रमाणात तांब्याचे व ॲल्युमिनियमचे साहित्य आढळून आले. वाहनावर बनावट नंबरप्लेट लावण्यात आली होती.
३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
जप्त केलेल्या स्कॉर्पिओ गाडीची अंदाजे किंमत १० लाख रुपये आहे. याशिवाय, सुमारे १,२०० किलो वजनाचे २२ कॉपर रोल्स आणि अंदाजे २५० किलो वजनाच्या ॲल्युमिनियमच्या तारांचे पाच बंडल जप्त करण्यात आले आहेत. या धातूंच्या साहित्याची एकत्रित किंमत सुमारे २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.
आंतरराज्यीय चोरीचे धागेदोरे
पोलिसांच्या तपासानुसार, स्कॉर्पिओ गाडी तमिळनाडू राज्यातील होसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेली होती. तर कॉपर रोल्स आणि ॲल्युमिनियमच्या तारांची चोरी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील लेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याची माहिती समोर आली आहे.
चोरीचा मुद्देमाल अन्य राज्यांतून बेळगावमध्ये आणून त्याची विक्री करण्यासाठी किंवा दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी चोरट्यांनी प्रयत्न केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अज्ञात चोरट्यांनी वाहन आणि मुद्देमाल रेल्वे ट्रॅकजवळ सोडून पलायन केले. या प्रकरणातील संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२९/२०२६ नोंदविण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस आयुक्त निखिल प्रकाश अमृत, पोलीस उपायुक्त एन. व्ही. भरमणी, पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस आणि मार्केट विभागाचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय एच. एल. केरूर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित पथकाचे कौतुक केले.

Belgaum Varta Belgaum Varta