Friday , November 6 2026
Breaking News

यंदाचा राष्ट्रवीरकार गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कार विवेक सावंत यांना जाहीर

Spread the love

 

४ डिसेंबर रोजी येळ्ळूरमध्ये पुरस्कार वितरण सोहळा; भव्य आयोजनाचा निर्धार

येळ्ळूर : यंदाचा राष्ट्रवीरकार गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महाराष्ट्रातील संगणकतज्ज्ञ श्री. विवेक सावंत यांना जाहीर झाला आहे. येळ्ळूर येथील सैनिक भवनात झालेल्या पुरस्कार समितीच्या बैठकीत समितीच्या अध्यक्षा आणि कोल्हापूर येथील इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी पुरस्कारार्थी विवेक सावंत यांचा परिचय करून दिला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव मुरकुटे होते. प्रारंभी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बबन कानशिडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. प्राचार्य आनंद मेणसे यांनी गुरुवर्य शामराव देसाई यांच्या सामाजिक कार्याचा सविस्तर आढावा घेत पुरस्कार सोहळ्याचे स्वरूप स्पष्ट केले.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. मराठा समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी गुरुवर्य शामराव देसाई यांच्यासारख्या समाजसुधारकांच्या कार्याची आजही गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येळ्ळूरच्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

भव्य पुरस्कार सोहळ्याचे नियोजन

पुरस्कार वितरण सोहळा भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्धार बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी येळ्ळूर ग्रामीण साहित्य संघाचे माजी अध्यक्ष परशुराम मोटरचे, येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील, नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील आणि नवहिंद क्रीडा केंद्राचे सचिव आनंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

बैठकीला तालुका पंचायतचे माजी सदस्य रावजी पाटील, शिवाजी देसाई, सैनिक सोसायटीचे चेअरमन परशुराम घाडी, संचालक मोनाप्पा पाटील, माजी अध्यक्ष शांताराम गुरुजी, येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष विलास घाडी, कार्याध्यक्ष भुजंग पाटील, प्रा. सी. एम. गोरल, उद्योगपती एन. डी. पाटील, पुंडलिक मेणसे, शेखर पाटील, नारायण बसतवाडकर, किशोर मालूचे, रघुनाथ मुरकुटे, मनोहर पाटील, दशरथ पाटील, सुधीर मानकोजी, यल्लाप्पा जाधव, सिद्धार्थ पाटील, निखिल पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, डॉ. मंजुश्री पवार, प्राचार्य आनंद मेणसे, प्रकाश मरगाळे आणि रावजी पाटील यांनी येळ्ळूर येथील गुरुवर्य शामराव देसाई यांच्या जुन्या घराला तसेच त्यांनी सुरू केलेल्या गावातील समितीच्या शाळांना भेट दिली. मुख्याध्यापक परशुराम गोरल यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *