


तिसऱ्या मुलाने गावकऱ्यांना दिली घटनेची माहिती
रामदुर्ग : रामदुर्ग तालुक्यातील बन्नूर येथे तलावात बुडून दोन नऊ वर्षीय शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. मनोज विठ्ठल बडीगेर आणि फारुख दादासाब चिल्लेदार (दोघेही रा. बन्नूर) अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी दोन्ही मुले गावाजवळील तलाव परिसरात प्रातर्विधीसाठी गेली होती. यावेळी तलावातील चिखलात त्यांचे पाय रुतल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. परिणामी, पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला.
या मुलांसोबत असलेल्या अन्य एका मुलाने घडलेल्या घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. रामदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक बडीगेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच पंचनामा केला.
या घटनेची नोंद रामदुर्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta