


हद्दीच्या कारणास्तव तपास हस्तांतरित; आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद
बेळगाव : मंडोळी येथे झालेल्या सर्वेश अभिजित कंग्राळकर खून प्रकरणाचा तपास माळमारुती पोलिसांकडून बेळगाव ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मंडोळी परिसर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने हद्दीच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या खून प्रकरणाचा पुढील तपास आता ग्रामीण पोलिसांकडून केला जाणार आहे.
मागील वर्षी झालेल्या वादातून निर्माण झालेल्या पूर्ववैमनस्यातून सर्वेश याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचा आरोप आहे. खुनानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीत फेकून दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
२० सप्टेंबर रोजी भवानीनगर पोलीस हद्दीतील मंडोळी मुख्य रस्त्यावरील वाटवे इस्टेट रस्त्यावर सर्वेश याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. पोटावर, दोन्ही हातांवर आणि गळ्यावर वार झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शंकरपेट पुलाखालील मलप्रभा नदीत टाकण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.
या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान शशी जलगार, राहुल जलगार, दशरथ रजपूत, अरुण हुल्लोळी, सचिन पागोजी, समर्थ पाटील, स्वयम पाटील आणि एका युवतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा पुढील तपासासाठी बेळगाव ग्रामीण पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपासाची दिशा आणि आरोपींच्या भूमिकेबाबत अधिक माहिती ग्रामीण पोलिसांच्या तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

Belgaum Varta Belgaum Varta