Friday , November 6 2026
Breaking News

सुवर्णसौध सभागृह बनले रणांगण; ऊस उत्पादक शेतकरी संघटनांच्या दोन गटांत हाणामारी

Spread the love

 

कर्नाटक सरकारच्या बैठकीपूर्वी गोंधळ; पाण्याचे ग्लास फेकले, दोन शेतकरी जखमी झाल्याची माहिती

बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वीच सोमवारी सुवर्ण विधानसौधातील सभागृहात शेतकरी संघटनांच्या दोन गटांत जोरदार वादावादी होऊन हाणामारी झाली. या घटनेमुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

राज्य रयत संघाचे चुनाप्पा पुजारी यांच्या गटातील कार्यकर्ते आणि कोडिहळ्ळी चंद्रशेखर यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये हा संघर्ष झाला. पिण्याच्या पाण्याची आणि चहाची योग्य व्यवस्था नसल्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद ऊस दराच्या मागणीवरून अधिक चिघळला. यावेळी एकमेकांवर काचेचे ग्लास फेकण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, दोन शेतकरी छातीला मार लागल्याने जखमी झाल्याची माहिती आहे.

साखर कारखानदारांसोबतची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार सौन्दत्ती यलाम्मा देवस्थानला गेले होते. मुख्यमंत्र्यांची सायंकाळी शेतकरी नेत्यांसोबत बैठक सुरु होताच कोडिहळ्ळी चंद्रशेखर गटाचे नेते महांतेश जमादार बोलत असताना आक्षेप घेण्यात आल्याने वादाची सुरुवात झाली.

यानंतर चुनाप्पा पुजारी यांनी शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यंदा प्रतिटन उसाला ४,५०० रुपये दर मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, कोडिहळ्ळी गटातील शेतकऱ्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. बाहेर प्रतिटन ५,५०० रुपयांची मागणी करणारे सभागृहात मात्र ४,५०० रुपयांचा दर का सांगत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावर पुजारी यांनी ४,५०० रुपये ऊसदरासोबत राज्य सरकारचे १,००० रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळून शेतकऱ्यांना एकूण ५,५०० रुपये मिळतील, अशी भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही गटांतील वाद वाढतच गेला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

आमदार दर्शन पुट्टणय्या आणि शेतकरी नेत्या चुक्की नंजुंडस्वामी यांच्यासह काही नेत्यांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तरीही गोंधळ सुरूच राहिल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. वादात सहभागी असलेल्या दोन शेतकऱ्यांना पोलिसांनी सभागृहाबाहेर नेले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *