


बेळगाव : १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिक कार्यकर्त्यांच्या वतीने मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी शहापूर येथे जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ६ वाजता शहापूर येथील गाडे मार्गावरील आचार्य गल्लीतील राम मंदिराशेजारील मोकळ्या जागेत ही सभा होणार आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांचे हक्क, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्रात सामील होण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर या सभेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या मूक मोर्चाची पूर्वतयारी करणे, तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये जनजागृती करणे हा या सभेचा मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिक कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित या सभेला मराठी भाषिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta