


निपाणी : निपाणी परिसरातील दौलतनगर (दौलतमळा) येथे जमिनीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी साहिल दिलीप शहा यांनी निखू पाटील यांच्याविरोधात बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या साहिल शहा यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
साहिल शहा यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सर्व्हे क्रमांक १५६ आणि १५९ मधील जमिनीच्या हद्दीवरून चर्चा करण्यासाठी ते संबंधित ठिकाणी गेले होते. या जमिनीवर प्लॉटिंग आणि ले-आऊटचे काम सुरू असून, जमिनीची मोजणी व हद्द निश्चित करण्यावरून दोन्ही बाजूंमध्ये यापूर्वीपासून वाद सुरू होता.
या विषयावर सुरू असलेल्या चर्चेचे रूपांतर वादात झाले. त्यानंतर निखू पाटील यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप साहिल शहा यांनी तक्रारीत केला आहे.
घटनेनंतर साहिल शहा यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तसेच व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून पडताळणी होणे आवश्यक असून, पुढील तपासानंतरच घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

Belgaum Varta Belgaum Varta