


मिशन ऑलिंपिक असोसिएशनच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
बेळगाव : राज्यातील नवोदित कुस्तीपटूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मिशन ऑलिंपिक असोसिएशन, कर्नाटक राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील २२ जिल्ह्यांमधून ४७० हून अधिक कुस्तीपटूंनी सहभाग घेतल्याने बेळगावात कुस्तीचा थरार अनुभवायला मिळाला.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन आणि हनुमानजींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कुस्ती लावून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, पोलीस उपायुक्त एन. व्ही. बरमणी, धनंजय जाधव, डॉ. सतीश चौलिगेर, विवेक किणयेकर, भारत पाटील, मीना बेनके, प्रवीण नाईकर आणि अमोल साठे यांच्यासह क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मिशन ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अतुल शिरोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रमुख पाहुण्यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बेळगावातील विविध व्यक्तींनी दिलेल्या सहकार्याचेही यावेळी कौतुक करण्यात आले.
राज्याच्या विविध भागांतून आलेल्या मल्लांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळाली. ग्रामीण तसेच शहरी भागातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांना भविष्यातील मोठ्या स्पर्धांसाठी तयार करण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या स्पर्धेमुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Belgaum Varta Belgaum Varta