Friday , November 6 2026
Breaking News

ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन!

Spread the love

 

हिंडलगा येथे शेतकऱ्यांची हेस्कॉम कार्यालयावर धडक; वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

हिंडलगा : बेळगाव तालुक्यातील विविध गावांच्या शिवारात नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मरमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी हिंडलगा येथील हेस्कॉम कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. ट्रान्स्फॉर्मर तातडीने दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

उचगाव, गोजगा, आंबेवाडी, मण्णूर आणि हिंडलगा परिसरातील अनेक ट्रान्स्फॉर्मर बंद असल्याने सिंचनात अडथळे निर्माण झाले आहेत. वीजपुरवठ्याअभावी पिकांना पाणी देणे कठीण झाले असून पिके वाळण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वारंवार मागणी करूनही दुरुस्ती होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी हेस्कॉम अधिकाऱ्यांनी दररोज काही ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त केले जात असल्याची माहिती दिली. मात्र, विलंबामुळे शेतीचे नुकसान होत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, मनोहर राक्षे, अशोक यळगुकर, खाचो तरळे, परशराम सांबरेकर, बसवंत सांबरेकर, मारुती तरळे, लक्ष्मण सांबरेकर, रघुनाथ पावशे, संजय पाटील, आप्पाजी यळगुळकर यांच्यासह विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते.

आंदोलनाशिवाय पर्याय नाही

“वारंवार मागणी करूनही समस्येची पुरेशी दखल घेतली जात नाही. ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीला विलंब झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे वीजपुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही,” असा इशारा समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांनी दिला.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *