


मजुरांची परवड, जनावरे उपाशी; सोयाबीनचा हंगामही संपुष्टात
निपाणी (वार्ता) : दरवर्षीप्रमाणे यंदाही वेळेत ऊस तोडणीचा हंगाम सुरू होईल, या आशेने महाराष्ट्रातील बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद भागातील ऊस तोडणी मजूर कर्नाटक सीमाभागात महिन्यापूर्वी दाखल झाले आहेत. या काळात त्यांना सोयाबीन काढणीची मजुरी मिळाली होती. पण आता हे कामही संपुष्टात आले आहे. ऊसदराचा तोडगा अद्याप निघाल्याने मजुरांना बसूनच दिवस काढावे लागत आहेत. त्यामुळे त्यांची परवड होत असून जनावरांचेही चाऱ्याविना हाल होत आहेत.
यावर्षी पाऊस कमी झाल्याने उसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे मजुरांना काही महिनेच काम मिळणार आहे. याशिवाय ऊस तोडणीसाठी यंत्राचा वापर केला जात असल्याने घेतलेली उचल फिटणार का? असा प्रश्नही मजुरांना भेडसावत आहे. तर उत्पादन घटल्याने शेतकरीही अडचणीत सापडला आहे. त्यामुळे विविध शेतकरी संघटनानी प्रति टन ऊसाला ५५०० रुपयांची मागणी केली आहे. पण या दराला सरकार आणि साखर कारखानदारांनी मान्यता दिलेली नाही. त्यामुळे आंदोलनाचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे हे आंदोलन मिटून ऊस तोडणी कधी सुरू होणार, याकडे शेतकरी आणि मजुरांचे लक्ष लागले आहे.
——————————————————————–
‘खतासह औषधाच्या किमती शासनाने वाढविले आहेत. त्या प्रमाणात किमान प्रतिटन ५५०० मिळाला पाहिजे. या मागणीवर आपण ठाम असून शेतकऱ्यांनी ऊस तोडणी देण्यासाठी घाई गडबड करू नये.’
-राजू पोवार, कार्याध्यक्ष, कर्नाटक राज्य रयत संघटना संघटना

Belgaum Varta Belgaum Varta