



बेळगाव: “भजन हे फक्त कलियुगात नाही तर ते सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापर युगातही होते, भजनाने मन तृप्त होते, समाधान प्राप्त होते. भजनामध्ये मोठी शक्ती आहे, भजन हे मनाला प्रसन्न करणारे असल्याने देवाला भजन आवडते आणि म्हणूनच भजनाशिवाय तरुनोपाय नाही हे लक्षात घेऊन साधू संतानी भजनाचा मार्ग मोकळा करून दिला” असे विचार ह. भ. प. श्री. यल्लाप्पा गिरमल महाराज, सांबरा यांनी बोलताना व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या संगीत भजन स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी मराठा मंदिरच्या सभागृहात झाले. उद्घाटनास श्री. गिरमल महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ज्ञानेश्वर, तुकाराम व नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
वाचनालयाचे अध्यक्ष रघुनाथ बांडगी यांनी उपस्थितांचे स्वागत करून विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेचे पूजन केले. वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर विनोद गायकवाड यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे कार्यवाह प्रसन्न हेरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहकार्यवाह शिवाजी हंगिरकर यांनी केले.
या भजन स्पर्धेत एकंदर 29 संघानी भाग घेतला असून पहिल्या दिवशी पाच महिला भजनी मंडळाची भजने सादर झाली. तत्पूर्वी सदाशिवनगरच्या श्रीहरी महिला भजनी मंडळाने आपला कलाविष्कार सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
“1977 पासून संभाजी उद्यानात सुरू झालेल्या ज्ञानेश्वरी पारायण याचा गिरमल महाराजांनी उल्लेख केला. तेव्हापासून गेली 48 वर्षे सलग आपण 800 भक्तांची पायी वारी करीत आहोत अशी माहिती ही त्यांनी दिली.
उद्या महिलांची 11 भजने सादर होणार असून शुक्रवार व शनिवारी पुरुष गटाची 13 भजने सादर होतील. नागरिकांनी उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद लुटावा असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta