



निवृत्त मुख्याध्यापकांच्या ३०० दिवसांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणासाठी मागितली होती ५ हजारांची लाच
बेळगाव : निवृत्त मुख्याध्यापकांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून सौन्दत्ती येथील क्षेत्र शिक्षणाधिकारी (BEO) कार्यालयातील अधीक्षक विठ्ठल रावळ यांना लोकायुक्त पोलिसांनी लाच घेताना रंगेहात पकडले.
सौन्दत्ती शहरातील पदकिपुरम परिसरात राहणारे निवृत्त मुख्याध्यापक श्रीशैल बसाप्पा बेट्टद यांना निवृत्तीनंतर नियमानुसार मिळणाऱ्या ३०० दिवसांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणाची रक्कम मंजूर करून घ्यायची होती. या प्रक्रियेसाठी कार्यालयाचे अधीक्षक विठ्ठल रावळ यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी तक्रारदारांनी २७ ऑक्टोबर रोजी बेळगाव येथील कर्नाटक लोकायुक्त पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लोकायुक्त पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील सुधारित कलम ७(अ) अंतर्गत गुन्हा क्रमांक १०/२०२६ नोंदविला.
पोलीस अधीक्षक प्रसन्न देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोकायुक्त पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक व्यंकटेश यडहळ्ळी, जी. एस. पाटील आणि एस. एच. होसमनी यांच्यासह पथकाने सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना विठ्ठल रावळ यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा पुढील तपास लोकायुक्त पोलिसांकडून सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta