Friday , November 6 2026
Breaking News

कोनेवाडीतील भगवा ध्वज प्रकरण : शिवसेनेचे विजय देवणे यांच्यासह चौघांचे वॉरंट रद्द; सशर्त जामीन मंजूर

Spread the love

 

 

जेएमएफसी चौथ्या न्यायालयाची कारवाई

बेळगाव : कोनेवाडी येथे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून भगवा ध्वज फडकविल्याच्या कथित प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह चार नेत्यांचे वॉरंट बेळगाव येथील जेएमएफसी चौथ्या न्यायालयाने रिकॉल केले आहे. बुधवारी (२८ ऑक्टोबर) न्यायालयात हजर झाल्यानंतर चौघांनाही सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

या प्रकरणात विजय देवणे, संग्रामसिंग कुपेकर देसाई, सुनील शिंत्रे आणि संतोष मळवीकर यांच्याविरोधात न्यायालयीन सुनावणीला अनुपस्थित राहिल्याने वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी चौघेही न्यायालयात हजर झाले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे वॉरंट रिकॉल करून जामीन मंजूर करण्यात आला.

२१ जानेवारी २०२१ रोजी बेळगाव महानगरपालिका कार्यालयासमोर कन्नड समर्थक संघटनांनी कन्नड ध्वज उभारला होता. या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांच्या हक्कांच्या समर्थनार्थ विजय देवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोनेवाडी येथे भगवा ध्वज फडकविल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता. या घटनेमुळे दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप होता.

न्यायालयीन प्रक्रियेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय देवणे यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांचा लढा गेल्या ७० वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नेहमीच सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा दिला आहे. कितीही अडचणी आल्या तरी मराठी जनतेच्या हक्कांसाठीचा लढा सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

या प्रकरणात वकील म्हणून शामसुंदर पत्तार, हेमराज बेंचनावर, विशाल चौगुले आणि ज्योतिबा पाटील यांनी काम पाहिले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर आणि शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *