



बेळगाव : विणकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि महिला सक्षमीकरणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल बेळगावच्या आशा पत्रावळी यांना ‘भारतीय राष्ट्रगौरव २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ग्लोबल पीस कौन्सिल, नवी दिल्ली यांच्यातर्फे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आशा पत्रावळी यांनी विणकाम क्षेत्रात विविध नावीन्यपूर्ण प्रयोग केले असून, विणकाम विषयावर पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थिनी, तरुणी आणि महिलांना विणकामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मदत केली आहे. त्यांच्या या कार्यामुळे महिलांना कौशल्य विकासासोबतच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.
समाजाला प्रेरणा देणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘भारतीय राष्ट्रगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येते. सामाजिक सेवा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण, नवकल्पना, उद्योजकता तसेच कला आणि संस्कृती या क्षेत्रांतील योगदानाची या उपक्रमातून दखल घेतली जाते.
आशा पत्रावळी यांना मिळालेल्या या सन्मानामुळे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta