Friday , November 6 2026
Breaking News

कर्नाटकात शिक्षक भरती नियमांत महत्त्वाचा बदल; मराठी आणि उर्दू माध्यमातील उमेदवारांना मोठा दिलासा

Spread the love

 

बेंगळुरू : कर्नाटक सरकारने शालेय शिक्षण विभागातील शिक्षक भरती नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कर्नाटक शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने ‘विशेष राजपत्र’ (अधिसूचना क्र. EP 80 DPI 2026) जारी करून मसुदा नियम प्रसिद्ध केले आहेत. या नवीन सुधारणेमुळे प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी आणि उर्दू माध्यमाच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मराठी आणि उर्दूतून प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार
नवीन मसुदा नियमांनुसार, इयत्ता ६ वी ते ८ वी साठीच्या ‘पदवीधर प्राथमिक शाळा शिक्षक’ (GPT) संवर्गासाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत (CET) मोठा बदल करण्यात आला आहे. आता पेपर-१ (सामान्य) आणि पेपर-२ (विषय विशिष्ट) च्या प्रश्नपत्रिका आवश्यकतेनुसार मराठी किंवा उर्दू भाषेतही तयार केल्या जाणार आहेत. याशिवाय, पेपर-१ मधील ‘सामान्य कन्नड’ ऐवजी आता ‘सामान्य कन्नड किंवा सामान्य उर्दू किंवा सामान्य मराठी’ असा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.
तसेच मराठी आणि उर्दू भाषा शिक्षकांसाठी १०० गुणांचा विषय ज्ञानाचा वस्तुनिष्ठ (OMR आधारित) पेपर समाविष्ट करण्यात आला आहे.

४-वर्षीय इंटिग्रेटेड बी.एड. पदवीधारकांना संधी
हायस्कूल (माध्यमिक शाळा) सहायक शिक्षक पदांसाठी केवळ पारंपरिक बी.एड. पदवी नव्हे, तर ‘४-वर्षीय इंटिग्रेटेड शिक्षक शिक्षण पदवी’धारक उमेदवारांनाही पात्र ठरवण्यात आले आहे. कला, जीवशास्त्र व भाषा शिक्षकांसाठी ही पात्रता ग्राह्य धरली जाईल.
या उमेदवारांच्या गुणांची टक्केवारी ठरवताना CET मधील गुणांना ८५% वेटेज आणि चार वर्षांच्या इंटिग्रेटेड पदवीतील गुणांना १५% वेटेज दिले जाईल.

१५ दिवसांत हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन
शासनाने प्रसिद्ध केलेल्या या मसुदा नियमांवर कोणाचे आक्षेप किंवा सूचना असल्यास, राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत त्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे (एम.एस. बिल्डिंग, डॉ. बी.आर. आंबेडकर विधी, बेंगळुरू – ५६० ००१) सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही आणि अंतिम नियम लागू केले जातील, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *