Friday , November 6 2026
Breaking News

महागाईचा भडका! तांदळाची शंभरीकडे वाटचाल

Spread the love

 

चार महिन्यांत दरात ३० टक्क्यांची वाढ; अपुरा मान्सून, घटती आवक आणि निर्यातीमुळे दरवाढीची शक्यता

बेळगाव : महागाईच्या वाढत्या आलेखामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना, दुष्काळाच्या सावटामुळे अन्नधान्यांच्या किमतीतही वाढ होत आहे. रोजच्या भोजनातील महत्त्वाचा घटक असलेल्या तांदळाच्या दरानेही आता सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार महिन्यांत तांदळाच्या किरकोळ दरात सुमारे ३० टक्क्यांची वाढ झाली असून, आगामी काळात प्रतिकिलो दर शंभर रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जूनमध्ये प्रतिकिलो ५२ रुपये असलेला तांदूळ ऑक्टोबरमध्ये ६७ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या चार महिन्यांत प्रतिकिलो दरात १५ रुपयांची वाढ झाली आहे. काही प्रकारच्या तांदळाचे दर यापेक्षाही अधिक असल्याने ग्राहकांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे.

अपुरा मान्सून, घटती आवक कारणीभूत

अपुरा मान्सून हे दरवाढीमागील प्रमुख कारण असल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात विविध बाजारपेठांमधील धान्याची आवक १० ते ४० टक्क्यांनी घटल्याचे चित्र आहे. आगामी पिकाच्या उत्पादनाबाबतही अनिश्चितता कायम आहे. त्यातच तांदळाची निर्यात सुरू असल्याने देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडून दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

जागतिक मागणीचा दबाव

एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या हवामानविषयक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय तांदळाच्या जागतिक मागणीचाही बाजारावर परिणाम होत आहे. आखाती देश, सिंगापूर तसेच काही आफ्रिकी देशांकडून भारतीय तांदळासाठी विचारणा होत असल्याचे व्यापारी सांगतात. जुन्या तांदळाचा साठा संपल्याने व्यापाऱ्यांना आता नव्या मालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे नवीन आवक आणि बाजारातील उपलब्धता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी देशात तांदळाचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय अन्न महामंडळाकडे पुढील १८ ते २० महिन्यांची देशाची गरज भागवू शकेल इतका तांदूळ साठा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, पुरेसा सरकारी साठा असल्याच्या आश्वासनानंतरही किरकोळ बाजारातील दरवाढीचे संकट कायम आहे. त्यामुळे आगामी काळात तांदळाचे दर कोणत्या पातळीवर पोहोचतात, याकडे सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *