



गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; खुनाचा आरोप
बेळगाव : शहरातील आनंदनगर वडगाव परिसरात एका ३३ वर्षीय विवाहित महिलेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पूनम अमित डेळेकर असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत तिच्यासोबत मैत्री असलेल्या रंजन मरवे याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पूनम या शहरातील एका कार्यालयात नोकरी करत होत्या. त्यांचे पती अमित हे नोकरीनिमित्त कुवेत येथे वास्तव्यास आहेत. गेल्या काही वर्षांपासून पूनम आणि रंजन मरवे यांच्यात मैत्री होती. त्याच्यासाठी पूनम यांनी स्वतःचे घर सोडून भाड्याच्या घरात राहण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास रंजन याने पूनम यांच्या नातेवाइकांना फोन करून पूनमने आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र, रंजन यानेच पूनम हिचा खून करून त्याला आत्महत्येचे स्वरूप दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
घटनास्थळी स्वयंपाकघरात मद्याची बाटली आढळून आली असून, पार्टीदरम्यान ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगावच्या बीम्स रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta