



मराठी अस्मितेसाठी निवडणुका जिंकण्याचा येळ्ळूर म.ए. समितीचा निर्धार
येळ्ळूर : सीमाभागातील मराठी जनतेवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनानिमित्त आयोजित सायकल फेरीत येळ्ळूरमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. सीमाभागातील जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून मराठी भाषेप्रती असलेली अस्मिता आणि एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गावात आयोजित जनजागृती फेरीदरम्यान करण्यात आले.
यावेळी समितीचे सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर यांनी येळ्ळूर गावाने सीमालढ्यात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. सीमालढ्याचा गौरवशाली इतिहास तरुण पिढीने जाणून घ्यावा आणि मराठी अस्मितेची ही मशाल पुढे घेऊन जावी, असे आवाहन त्यांनी केले.
मराठी अस्मितेचा भगवा फडकवत ठेवण्याचा निर्धार
आगामी तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे. मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी भगव्या झेंड्याखाली एकजुटीने उभे राहून या निवडणुका प्रचंड मताधिक्याने जिंकाव्यात आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला अभेद्य ठेवावा, असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी आणि अध्यक्ष वामन पाटील यांनी मार्गदर्शन करताना केले.
सुगीचे दिवस असतानाही मराठी अस्मितेच्या भावनेतून जनजागृती फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले. सीमाप्रश्नाच्या लढ्यात प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय योगदान द्यावे आणि मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी एकजुटीने संघर्ष सुरू ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.
या जनजागृती फेरीत सतीश देसूरकर, प्रकाश मालुचे, श्रीकांत नांदुरकर, कुगजी, प्रवीण कंग्राळकर, पुंडलिक कंग्राळकर, नारायण मरवे, पप्पू कंग्राळकर, लक्ष्मण कुंडेकर, यल्लाप्पा हुव्वान्नावर, शटुप्पा पुण्यान्नावर, गणेश अष्टेकर, रामा पाखरे, नंदकुमार पाटील, कृष्णा शहापूरकर, दत्ता उघाडे, नेताजी गोरल, प्रकाश पाटील, सातेरी गोरल, नागेश बोबाटे, कृष्णा बिजगरकर, दयानंद उघाडे, राकेश परीट, बाळू कंग्राळकर, भीमराव पुण्याणावर, पंकज धामणेकर, रामा कुगजी, गणेश कंग्राळकर, प्रकाश सायनेकर, अनंत पाटील, अशोक ज. धामणेकर, प्रकाश काकतकर, संदीप कंग्राळकर, काशिनाथ मरवे, सुमीत चतुर, पप्पू धामणेकर, सोमनाथ बाटले, रमेश गोरल, प्रवीण वालेकर, सागर हंपण्णावर, पिंटू मुतकेकर, लक्ष्मण कुंडेकर, मारूती धामणेकर, यल्लापा हुव्वाणावर, प्रवीण गणाचारी, सुनील कांबळे, शटुप्पा पुण्याणावर, आनंद गोरल, कार्तिक कोकणे, सौरभ गणाचारी, योगेश सायनेकर, राहूल कुगजी, सुमंत कुगजी, रोहीत धामणेकर, सुरज पाटील, रामा पाखरे, यलुपा पाटील आणि बाळकृष्ण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी राजू पावले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta