Friday , November 6 2026
Breaking News

खानापूर फिटनेस क्लबचा पुढाकार; पाच खेळाडू विद्यार्थिनींना मिळणार विशेष प्रशिक्षण

Spread the love

 

बेळगाव : मराठा मंडळ संचलित म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या कबड्डी खेळाडूंना अधिक सक्षम आणि तंदुरुस्त बनविण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील बॉडीबिल्डर तथा खानापूर फिटनेस क्लबचे मालक व प्रमुख प्रशिक्षक नितीन राजाराम पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या वतीने महाविद्यालयातील पाच होतकरू कबड्डीपटू विद्यार्थिनींना विनामोबदला मसल ट्रेनिंग आणि विशेष शारीरिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.

नितीन पाटील यांनी बॉडीबिल्डिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला आहे. राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याबरोबरच २०२१ मध्ये राष्ट्रीय स्तरावर कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या अनुभवाचा उपयोग ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना व्हावा, या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचा कबड्डी संघ तालुक्यात अव्वल स्थानावर असून, संघातील खेळाडूंनी तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नुकत्याच कित्तूर उत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय राणी चन्नम्मा चषक कबड्डी स्पर्धेतही महाविद्यालयाच्या महिला संघाने विजेतेपद पटकावले आहे.

ग्रामीण आणि दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये क्रीडा कौशल्य व जिद्द असूनही योग्य शारीरिक प्रशिक्षणाच्या संधी मर्यादित असतात. ही बाब लक्षात घेऊन नितीन पाटील यांनी पाच विद्यार्थिनींच्या शारीरिक क्षमतेत वाढ व्हावी, यासाठी दररोज सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत स्वतः मोफत प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

या उपक्रमाचे कौतुक करताना मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू म्हणाल्या की, आपल्या खेळातील अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजू व होतकरू खेळाडूंना पुढे आणणे ही खरी सामाजिक जाणीव आहे. आर्थिक परिस्थिती किंवा दुर्गम भागातील वास्तव्य खेळाडूंच्या प्रगतीत अडथळा ठरू नये, या उदात्त हेतूने नितीन पाटील यांनी घेतलेला पुढाकार इतरांसाठीही प्रेरणादायी आहे.

या संपूर्ण उपक्रमासाठी मराठा मंडळाचे संचालक शिवाजीराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील, क्रीडा प्रशिक्षक प्रशांत पांखरे आणि प्राध्यापक वर्गाने नितीन पाटील यांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.

ग्रामीण भागातील महिला कबड्डीपटूंना सक्षम व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था जिल्ह्यात अव्वल

Spread the love  रेशन दुकानदारांच्या मासिक बैठकीत सुर्यकांत कुलकर्णी यांचे गौरवोद्गार; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *