Friday , November 6 2026
Breaking News

बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; पोलीस निरीक्षक अरुण साळुंखे यांच्यासह सहा जणांचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव जिल्ह्यातील आरताळ गावावर शोककळा

बेळगाव : उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामचे दर्शन घेऊन परतणाऱ्या हेलिकॉप्टरचा जोशीमठजवळील हत्ती पर्वत परिसरात भीषण अपघात झाला. गुरुवारी (३० ऑक्टोबर) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बंगळुरू गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण साळुंखे यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्स भारत एव्हिएशन या खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर बद्रीनाथहून डेहराडूनच्या दिशेने जात होते. चमोली जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ हत्ती पर्वत परिसरात हेलिकॉप्टरचा ताबा सुटल्याने ते कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच भारतीय सेना, स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने बचावकार्य सुरू केले. प्रतिकूल हवामान आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे बचावकार्यात अडचणी आल्या. अखेर पायलटसह सर्व सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

बेळगाव जिल्ह्याचा सुपुत्र काळाच्या पडद्याआड

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले पोलीस निरीक्षक अरुण साळुंखे हे बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील आरताळ गावचे रहिवासी होते. २००७ च्या बॅचचे अधिकारी असलेल्या साळुंखे यांनी सुरुवातीच्या काळात दिल्ली येथे गुप्तचर विभागात सेवा बजावली होती. त्यानंतर कर्नाटकातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये काम केले. सध्या ते बंगळुरूच्या केंद्रीय गुन्हे शाखेत (सीसीबी) पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

तीन दिवसांपूर्वीच ते बद्रीनाथ यात्रेसाठी गेले होते. गुरुवारी ते परतणार असल्याने कुटुंबीय त्यांची प्रतीक्षा करीत होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघाताची माहिती नातेवाईकांना मिळाली. सुरुवातीला ते बेपत्ता असल्याचे समजल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी समोर आली.

अरुण साळुंखे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे आरताळ गावासह संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात शोककळा पसरली असून पोलीस दलातूनही हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *