Friday , November 6 2026
Breaking News

खानापूरच्या जुन्या बसस्थानकातून अखेर बससेवा सुरू!

Spread the love

 

सूर्यकांत कुलकर्णी यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला यश; आजपासून काही बसफेऱ्या सुरू, उर्वरित सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार

खानापूर : खानापूर शहरातील राजा शिवछत्रपती चौक येथील जुन्या बसस्थानकातून गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली बससेवा अखेर शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू झाली आहे. पंचगॅरंटी योजना अंमलबजावणी समितीचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी बससेवा तातडीने सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) खानापूर आगार प्रशासनाने काही बसफेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खानापूरच्या जुन्या बसस्थानकातून शिवस्मारक चौक मार्गे होणारी बसवाहतूक रस्त्याच्या समस्येमुळे अनेक महिन्यांपासून बंद होती. परिणामी शहरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. जुन्या बसस्थानकातून बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. यासंदर्भात विविध संघटना आणि नागरिकांनी प्रशासनाला निवेदनेही दिली होती.

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची दखल

लोकमान्य भवन येथे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रजासेवा आंदोलन कार्यक्रमातही नागरिकांनी बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर ठोस निर्णय होत नसल्याने सूर्यकांत कुलकर्णी यांनी खानापूर केएसआरटीसी आगार व्यवस्थापक संतोष यांची भेट घेऊन बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता.

तसेच जुन्या बसस्थानक परिसरात बसची वर्दळ वाढल्यानंतर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली.

आगार व्यवस्थापकांनी स्वतः बस चालवून केली सुरुवात

कुलकर्णी यांच्या मागणीची दखल घेत आगार व्यवस्थापक संतोष यांनी शुक्रवारपासून काही बसफेऱ्या जुन्या बसस्थानकातून सुरू करण्यास सहमती दर्शवली. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतः बस चालवत राजा शिवछत्रपती चौक येथील जुन्या बसस्थानकात बस आणली. बसस्थानक परिसरात बस वळवून पुन्हा आगाराकडे नेण्यात आली. या प्रात्यक्षिकातून जुन्या बसस्थानकातून बससेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.

यावेळी सूर्यकांत कुलकर्णी यांच्यासह अभिषेक शापूरकर, दत्ता वंजारे, आदित्य कलाल, विशाल सावंत, दिनेश जांबोटकर, राजू देवलतकर, शंकर चौगुले, केंपन्ना, सरफराज, राहुल, चंद्रकांत पाटील आणि संजू मादार आदी उपस्थित होते.

हल्याळ, गोवा, कारवारसह ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा

मलप्रभा नदीवरील पूल ते हेस्कॉम कार्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या कामात जमिनीच्या मोबदल्यावरून काही शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने रस्त्याची दुरुस्ती रखडली आहे. तसेच राजा शिवछत्रपती चौकात बस वळविण्यास अडचणी येत असल्याचे कारण देत या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली होती.

आता जुन्या बसस्थानकातून काही बसफेऱ्या सुरू झाल्या असून हल्याळ, गोवा, कारवार तसेच खानापूर तालुक्यातील नंदगड, लोंढा, हेमाडगा आदी भागांकडे जाणाऱ्या बसफेऱ्याही टप्प्याटप्प्याने पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक संतोष यांनी दिली.

प्रवाशांची अनेक महिन्यांची प्रतीक्षा संपली

जुन्या बसस्थानकातून बससेवा पुन्हा सुरू झाल्याने खानापूर शहरातील व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय होणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुन्हा सुरळीत होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. उर्वरित सर्व मार्गांवरील बसफेऱ्याही लवकरात लवकर सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था जिल्ह्यात अव्वल

Spread the love  रेशन दुकानदारांच्या मासिक बैठकीत सुर्यकांत कुलकर्णी यांचे गौरवोद्गार; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *