



बेळगाव : माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.आर. गड्डेकर यांना त्यांच्या उत्कृष्ट तपासकार्याबद्दल प्रतिष्ठित केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. त्यांच्या या सन्मानामुळे बेळगाव शहर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
गुन्ह्यांचा सखोल तपास, पुराव्यांवर आधारित तपासपद्धती आणि जनस्नेही कार्यशैली यामुळे गड्डेकर यांनी पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा करून ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाचा तपास त्यांनी प्रभावीपणे केला होता. तसेच बेळगावातील एका खून प्रकरणात लक्ष्मण दड्डी टोळीविरोधात महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या तपासामुळे या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागणे, त्यांच्या तक्रारींची दखल घेणे आणि पोलिसांबद्दल जनतेत विश्वास निर्माण करणे हीदेखील त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत.
यापूर्वी त्यांना राष्ट्रपती पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. आता केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाल्याने त्यांच्या कामगिरीचे पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल पोलीस दलासह विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta