



मुतगे हायस्कूलमध्ये एकदिवसीय जनजागृती कार्यशाळा उत्साहात
मुतगे : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पॉक्सो (POCSO) कायद्याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. बालकांचे लैंगिक शोषण रोखणे व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रमुख व्याख्याते आणि शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष आर. वाय. पाटील यांनी केले.
मुतगे (ता. बेळगाव) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या पॉक्सो कायद्याबाबतच्या एकदिवसीय जनजागृती कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पाटील यांनी पॉक्सो कायद्याची पार्श्वभूमी, कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये, बालकांचे हक्क, सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शामधील फरक, अनुचित वर्तनाची जाणीव झाल्यास कोणाकडे मदत मागावी आणि अशा घटनांची माहिती जबाबदार व्यक्तींना देण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही भीतीशिवाय आपल्या अडचणी पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तींना सांगाव्यात. मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालक, शिक्षक आणि समाज या सर्वांनी सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. जाधव होते. प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य एस. एस. जाधव व शिवाजी हसनेकर यांनी व्याख्याते आर. वाय. पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. आर. तिरविर, प्रभारी मुख्याध्यापिका एम. बी. लगाडे, बी. व्ही. गुडगेनहट्टी, ए. एस. पाटील, एस. आर. पाटील, आकाश पाटील यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम कुराडे यांनी केले तर शिवाजी हसनेकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta