Friday , November 6 2026
Breaking News

काळ्या दिनाच्या सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा : बेळगाव तालुका म. ए. समितीचे आवाहन

Spread the love

बेळगाव : भाषावार प्रांतरचनेच्या वेळी बेळगाव, कारवार आणि बिदर येथील मराठी भाषिक प्रदेश तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस सीमा भागात काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. यंदाही रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगावात सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

१ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार विविध भाषिक राज्यांची निर्मिती झाली. त्यावेळी मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकात समाविष्ट करण्यात आल्याने सीमा भागातील मराठी जनतेने या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले. गेल्या ७० वर्षांपासून मराठी भाषिक जनता विविध मार्गांनी आपला असंतोष व्यक्त करीत असून, सत्याग्रह, साराबंदी, हरताळ, बंद, मेळावे, निदर्शने आणि मोर्चांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सामील होण्याची मागणी सातत्याने मांडत आहे.

या प्रश्नावर अनेकदा आश्वासने देण्यात आली, मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. महाराष्ट्र सरकारनेही सीमाप्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला असून, न्यायालयीन लढाई सुरू आहे. या कायदेशीर लढाईबरोबरच लोकशाही मार्गाने रस्त्यावरून आंदोलन सुरू ठेवणेही महत्त्वाचे असल्याचे समितीने म्हटले आहे.

याच पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर रोजी आयोजित सायकल फेरीत सीमा भागातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली भूमिका पुन्हा एकदा केंद्र सरकारसमोर मांडावी, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

सायकल फेरीसाठी रविवारी सकाळी ९ वाजता संभाजी उद्यान, बेळगाव येथे मराठी बांधव आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *