



जीर्ण इमारत पाडण्याचे काम सुरू; त्याच जागी आधुनिक सुविधांनी युक्त नवीन कार्यालय उभारणार
बेळगाव : बेळगाव शहराच्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या ब्रिटिशकालीन उपनोंदणी कार्यालयाच्या इमारतीला अखेर निरोप देण्यात येत आहे. अनेक दशकांपासून नागरिकांना सेवा देणारी ही ऐतिहासिक इमारत जीर्ण झाल्याने ती पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या जागी आधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत सुविधांनी युक्त नवीन कार्यालय उभारण्यात येणार आहे.
ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आलेली ही इमारत अनेक वर्षांपासून मालमत्ता नोंदणीसह विविध शासकीय कामांसाठी वापरात होती. काळाच्या ओघात इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि कार्यालयीन कामकाजाच्या सोयीचा विचार करून प्रशासनाने जुनी इमारत हटवून नवीन वास्तू उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या इमारत पाडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, संपूर्ण इमारत हटवून जागा मोकळी करण्यासाठी अंदाजे महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपनोंदणी कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस स्थलांतरित करण्यात आले आहे. तेथून मालमत्ता नोंदणीसह कार्यालयातील सर्व शासकीय सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
ऐतिहासिक वास्तू काळाच्या पडद्याआड जात असली, तरी तिच्या जागी आधुनिक सुविधांनी सज्ज कार्यालय उभे राहणार असल्याने नागरिकांना अधिक सुलभ आणि सोयीस्कर सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta