



गोसेवा संघटना आणि गोरक्षकांनी तातडीने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
खानापूर : येथील नवीन बसस्थानकासमोर खानापूर–बेळगाव मार्गावर एक गाय गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली आहे. या गाईच्या पायाला मोठी दुखापत झाली असून, वेळेत उपचार न मिळाल्याने जखमेत किडे पडले आहेत. त्यामुळे या मुक्या जनावराची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे.
नवीन बसस्थानक परिसरात अनेक बेवारस जनावरे मोकाट फिरत असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी ही जनावरे रस्त्यावरच बसत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. याचदरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत गाईच्या पायाला गंभीर दुखापत झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, दुखापतीनंतरही तिच्यावर उपचार न झाल्याने जखम अधिक गंभीर झाली आहे.
सध्या खानापूर तालुक्यात गोसेवा आणि गोरक्षणाबाबत जनजागृती केली जात असताना प्रत्यक्षात रस्त्यावर वेदना सहन करणाऱ्या या गाईच्या मदतीला कोण धावून येणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. गोसेवा संस्था, गोरक्षण संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांनी तातडीने पुढाकार घेऊन गाईला वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.
तसेच नगरपालिका प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागानेही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जखमी गाईला तातडीने उपचारासाठी हलवून नवीन बसस्थानक परिसरातील इतर मोकाट जनावरांच्या सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta