



बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि विश्वभारत सेवा समिती, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वक्तृत्व स्पर्धा नुकतीच पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत बेळगाव, खानापूर आणि हुक्केरी या तालुक्यांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
या स्पर्धेसाठी प्राथमिक गटातून ७० आणि माध्यमिक गटातून ४० अशा एकूण ११० स्पर्धकांनी नावनोंदणी केली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन नवहिंद सोसायटीचे चेअरमन श्री. शिवाजी सायनेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक वाचनालय बेळगावचे अध्यक्ष श्री. रघुनाथ बांडगी, तसेच नवहिंद सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री. अनिल हुंदरे व श्री. प्रकाश अष्टेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सचिव श्री. प्रकाश नंदिहळी यांनी करून दिला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. श्री. शिवाजी सायनेकर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
या प्रसंगी नवहिंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी, येळ्ळूर यांच्याकडून ग्रंथालयासाठी ५,००० रुपये मूल्याची पुस्तके तसेच श्री. पी. जे. घाडी यांच्याकडून १,००० रुपये मूल्याची पुस्तके देणगी स्वरूपात देण्यात आली.
स्पर्धा स्वरूप
प्राथमिक गटात विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे तीन गट पाडून प्राथमिक फेरी घेण्यात आली व त्यानंतर अंतिम फेरी पार पडली. माध्यमिक गटाची थेट एकाच फेरीत अंतिम स्पर्धा घेऊन विजेत्यांचे क्रमांक निश्चित करण्यात आले.
स्पर्धा विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे :
प्राथमिक गट
प्रथम क्रमांक: भूमी म्हात्रू भातकांडे (इयत्ता ६ वी, बालिका आदर्श विद्यालय, टिळकवाडी)
द्वितीय क्रमांक: दुर्वा विनोद कडोलकर (इयत्ता ५ वी, वनिता विद्यालय, बेळगाव)
तृतीय क्रमांक: ईशानी पंडित पाटील (इयत्ता ५ वी, कॅन्टोन्मेंट बोर्ड स्कूल, कॅम्प, बेळगाव)
उत्तेजनार्थ: आदिती दिनकर परमोजी (इयत्ता ६ वी, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) आणि मनाली मारुती कोवाडकर (इयत्ता ६ वी, सरकारी प्राथमिक मराठी शाळा, उचगाव)
माध्यमिक गट
प्रथम क्रमांक: भूमी वैजनाथ हलगेकर (इयत्ता ८ वी, बालिका आदर्श विद्यालय, टिळकवाडी)
द्वितीय क्रमांक: साईराज राम गुरव (इयत्ता ९ वी, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव)
तृतीय क्रमांक: लावण्या राजू यल्लारी (इयत्ता ९ वी, मराठा मंडळ जिजामाता हायस्कूल, बेळगाव)
उत्तेजनार्थ:
आर्या भैरव डवरी (इयत्ता ८ वी, सरस्वती गर्ल्स हायस्कूल, शहापूर), साक्षी प्रभाकर होसुरकर (इयत्ता १० वी, महात्मा गांधी हायस्कूल, नंदगड, खानापूर), सृष्टी गंगाराम देसाई (इयत्ता १० वी, बालिका आदर्श विद्यालय, टिळकवाडी)
स्पर्धेचे उत्तम परीक्षण श्री. देवकुमार बिर्जे, श्रीकांत चव्हाण, जयवंत खन्नूकर, शिवाजी पाटील, बसवंत शहापूरकर, प्रतिभा सडेकर, लता कणबरकर, बळीराम पाखरे, संजय बंड, महादेव खोत आणि नाथाजी मरगाळे यांनी केले.
बक्षीस वितरण व सहकार्य
स्पर्धेच्या सायंकाळी बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री. गोपाळ बिर्जे आणि प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पी. जे. घाडी उपस्थित होते.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाचे शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमास स्पर्धक, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. मयूर नागेनहट्टी यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta